Wednesday 12 February 2020

शेअर मार्केट - खेळाची सुरूवात


राम राम मंडळी, शेअर मार्केटच्या दुनियेत आपले स्वागत आहे. मित्रांनो ज्यांनी इंटरनेट वरील माहिती आणि यु-ट्युबच्या माध्यमातून शेअर मार्केट शिकण्याचे आणि समजुन घेण्याचे ठरविले आहे. त्यांना माझ्यासारखाच अनुभव आला असेल की, येथे प्रत्येकजण शेअर ट्रेडिंगच्या छोट्या छोट्या ट्रिक वापरुन आपल्याला कसे करोडपती होता येईल हे दाखवून देण्याच्या शर्यतीत लागला आहे आणि माझ्यासारखे अनेक जण या शर्यतीवर पैसा खर्च करुन बसलेले आहेत. परंतू जेव्हा मी या टिप्सच्या चक्रव्युहामधुन बाहेर पडलो आणि शेअर मार्केट खऱ्या अर्थाने समजुन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, अशा झटपट स्ट्रॅटर्जींचा अंमल करणे आणि रातोरात करोडपती होणे ही खेळाची खुप वरची पायरी आहे. त्यापुर्वी आपण पुर्ण खेळ समजुन घेणे आवश्यक आहे. नाहीतर आपण लवकरच खेळातून बाहेर फेकले ज्यान्याचीच अधिक संभावणा आहे.
जेव्हा माझ्या लक्षात आले की, आपल्याला सुरूवातीपासून शेअर मार्केट समजुन घेने आवश्यक आहे. तेव्हा मी सर्वप्रथम तेच केले जे प्रत्येक नवीन खेळाडू करतो,  मी एका महान खेळाडुकडे बघण्याचा प्रयत्न केला खेळाडु अर्थातच वॉरेन बफेट हेच होते. श्री. बफेट यांचे तत्वज्ञान हे खरोखरच शेअर मार्केटमधील गीतेचे श्लोक आहेत. परंतू सध्यातरी मला ते जसेच्या तसे अनुकरण करणे शक्य नाही. हे ही माझ्या लक्षात आले. त्याचे पहिले कारण म्हणजे त्यांनी सांगीतलेले महत्वाचे तत्व की तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केल्यास तिचे मालक असल्यासारखे वागा. ती संकटात असेल, म्हणजे तिचा शेअर कोसळत असेल तर तुमचे शेअर विकुन तिच्या पडझडीला अधिक हातभार लावू नका, तर शक्य तितके शेअर कमी किंमतीवर (अधिक योग्य किंमतीवर) विकत घेण्याचा प्रयत्न करा. परंतू नवीन गुंतवणूकदारास प्रश्न पडतो तो हा की, आपल्यासाठी हीच कंपनी योग्य आहे, हे कसे ठरवावे, त्यासाठी कितीतरी फंडामेंटल आणि टेक्नीकल मुद्दे आहे आणि ते समजुण घेणे आवश्यक आहे आणि दुसरे असे की, आपल्याला नफा लगेच दिसला नाही तर आपली शेअर मार्केटमधील जिज्ञासा कमी होऊन शिकण्याची गती कमी होते. याऊलट श्री. बफेट यांचे तत्वज्ञान चक्रवाढ व्याजाच्या शक्तीकडे आपले लक्ष वेधुन आपल्याला एका ट्रेडवर अधिकाधिक वेळ थांबण्याचा सल्ला देते.
नविन गुतवणुक दाराला पडणारा आणखी एक प्रश्न म्हणजे गुंतवणूक हाच जर योग्य पर्याय असेल तर मग हे संपुर्ण शेअर मार्केट चालवणारे मोठे ट्रेडर येवढी क्लीष्ट आकडेमोड करुन मोठमोठ्या सिस्टीम्स उभारुन ट्रेड का करत आहेत? याचे मला जे समाधानकारक उत्तर मिळाले ते असे की, विजेता आणि उप विजेता यांच्या मध्ये फार मोठे अंतर नसते परंतू जे थोडे अंतर असते, ते पार करु शकतो तोच विजेता ठरत असतो. येथे वैद्यकशास्त्राचे उदाहरण देणे योग्य ठरेल. वैद्यकशास्त्रात बेसीक शिक्षण (एमबीबीएस सारखे) पुर्ण केले की, आपण डॉक्टर होतो आणि काही रुग्णांवर उपचार करणेही आपल्याला शक्य होते. परंतू आपल्याला मोठा डॉक्टर व्हायचे असेल तर एक्सपर्ट डॉक्टर व्हावे लागते, आपण एक्सपर्ट होण्यासाठी एखाद्या अवयवाचा अभ्यास सुरू केल्यास अत्यंत सुक्ष्म पातळीवर तो अवयव समजायला पुर्ण आयुष्य खर्च केले तरी त्या अवयवाचे अध्ययन अपुर्णच राहते. अशा परिस्थीतीत पिढी दरपिढी अधिक संधोशन आणि विकास चालुच राहतो. आज वैद्यक शास्त्रात एकाच आजारावर पाच-दहा प्रकारचे वेगवेगळे उपचार उपलब्ध आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच उपचारांमुळे त्या आजाराला आळा घालता येतो. तसेच काहीसे शेअर मार्केटचे झालेले आहे. आपण ज्या टिप्स पाहतो त्या एकतर अशा एक्सपर्ट लोकांनी तयार केलेल्या असल्याने त्या केव्हा वापरायच्या हे सांगणारे एक सिक्स सेन्स त्यांच्यामध्ये अभ्यासाने विकसीत झालेले असते. त्यामुळेच ते आपली पध्दत किंवा ट्रिक किती फलदायी आहे, हे उदाहणासह सिध्द करु शकतात. परंतू आपण ती वापरुन पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यांनी जसे सांगितले तसे यश मात्र येत नाही. त्यामुळे आपण आगोदर किमान बेसिक अभ्यास करुन मार्केटमध्ये नफ्यात राहणे शिकणे आवश्यक आहे त्यानंतरच अशा शॉर्टकट ट्रिक समजून घेण्यास आणि त्या योग्य जागी वापरून यशस्वी होण्यात आपल्या यश येऊ शकेल. नाहीतर आपण प्रत्येक वेळी पैसा गमावूनच बसनार आहोत.
त्यामुळे आपल्याला आधी शेअर मार्केटचे बेसिक ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. एकदा का आपल्याला नफ्याची चव चाखता आली , स्वत:वरील आत्मविश्वास वाढला की नंतर पायरीपायरीने आपण सहाजीकच एक्सपर्ट होणार आहोत. जेव्हा मी इंटरनेटवर पायरी पायरीने बेसिक शिकण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, प्रत्येक जण झटपट नफ्याच्या मागे लागला आहे. बेसिक शिकवायला कुणाकडेच वेळ नाही. मराठी भाषेत तर शेअर मार्केटविषयक माहितीची खुपच कमतरता आहे. तेव्हा मला जसे शेअर मार्केट आणि पैशाचा खेळ समजला तो सुज्ञ वाचकांना समजावून सांगण्याचा मी निश्चय केला आहे. त्यामुळे मी www.learnmarathi.in च्या आणि Share Market मराठी या यु-टयुब चॅनलच्या माध्यमातून आपल्या आपल्या समोर पैशाचा हा खेळ मांडण्याचा प्रयत्न करनार आहे. मी स्वत: अजुन एक्सपर्ट झालेलो नाही. त्यामुळे आपल्या विधायक सुचना असतील तर त्यांचे नक्कीच स्वागत केले जाईल. आपल्याला माझा हा प्रयत्न नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो. धन्यवाद...!

No comments:

Post a Comment